मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले निर्बंध आता शिथिल होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील घटती रुग्णसंख्या, दुकाने, हॉटेल्सवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने कसे हटवता येतील, याबाबतचा सविस्तर अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्बंध शिथिलतेचा होण्याची शक्यता आहे.
निर्बंध होणार शिथिल -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मागितला होता. राज्यातील पॉझिटिव्हीटी दर, बेड्सची संख्या आणि इतर काही निकषांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालावर सविस्तर चर्चा होऊन आज (बुधवारी) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लसीकरण केलेल्या ग्राहकांना प्राधान्य -
अहवालातील शिफारशीनुसार राज्यात सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू करताना त्यांची वेळ आणि उपस्थितीची मर्यादाही वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जाणार असल्याचे समजते. यात रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री दहापर्यंत केली जाणार आहे. तर ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाणार असल्याचे समजते. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असेल. तसेच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यासंदर्भात विचार सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
निर्बंध शिथील करण्यासाठी दोन बैठका -
निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ७ जुलैला सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर लगेचच ९ जुलैला राज्य आपत्कालीन विभागातील अधिकाऱ्यांसोबतही मुख्यमंत्र्याची बैठक पार पडली. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली होती.