मुंबई - कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध लादण्यात आले असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग तसेच तपासणी करण्यात येत असून ज्या प्रवाशांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आहे, अशा प्रवाशांनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. ज्या प्रवाशांकडे कोरोना तपासणी अहवाल नाही, अशांची स्क्रीनिंग व तपासणी करूनच त्यांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. तपासणी दरम्यान एखादा संशयित आढळून असल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागपूर
नागपूर रेल्वे स्थानकावर बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची चौकशी केली जात आहे. यात आरटीपीसीआर चाचणी अहवाल तपासला जात आहे. शिवाय तो अहवाल नसेल तर राज्य सरकारच्या पथकाकडून रेल्वे स्थानकावरच आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्यानंतरच पुढे प्रवेश दिला जात असल्याचे पहायला मिळत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर या चौकशीसाठी राज्य सरकार व रेल्वे विभागाचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटण्यास प्रशासनाला मदत होत आहे.
पालघर
पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र व गुजरातला जोडणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी, झाई चेक पोस्टवर गुजरात व राजस्थानमधून येणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने मुंबई- अहमदाबाद महामार्गावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीकरिता पाच ठिकाणी दहा पथके तैनात केली आहेत.
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवर बांदा सटमटवाडी येथील चेकपोस्टवर आजपासून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील महसूल आणि आरोग्य विभागाची संयुक्त पथके या कार्यासाठी नेमण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रवाशांच्या गाडीची आणि वैयक्तिक माहितीची नोंद केली जात आहे. शासनाच्या आदेशानुसार आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील बांदा येथे प्रवाशांची तपासणी करून त्यांना जिल्ह्यात घेतो. प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. ज्यांचे शारीरिक तापमान 99 अंशापेक्षा जास्त आहे, त्यांना एकतर पुन्हा गोव्यात पाठवतो किंवा त्यांची बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन चाचणी केली जाईल. तिथे ते पॉझिटिव्ह सापडले तर, त्यांना आम्ही शेर्ले येथे सीसीसी सेंटरमध्ये दाखल करणार आहोत, अशी माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.