मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेने आपल्या महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वेग दिला आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे या कामामुळे अनेक रहिवाशांची झोप उडाली आहे. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस वरळी आणि हाजीअली परिसरात मशीनचा, कामाचा आवाज वाढत आहे. रात्री अडीच- तीन वाजता आवाज वाढत असल्याने झोपमोड होत असल्याच्या तक्रारी रहिवासी करत आहेत.
रात्रीच्या वेळेस आवाजाची पातळी 79 डेसीबलपर्यंत जात आहे. तर, याबाबत तक्रार करूनही काही फायदा होत नसल्याचे म्हणत रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमध्येही कोस्टल रोडचे काम सुरू होते. तर आता अनलॉकमध्ये कामाचा वेग पालिकेने वाढवला आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून रात्री आवाजाची कामे सुरू झाली आहेत. या कामाला 24 तास परवानगी असली तरी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत विना आवाजाचीच कामे करता येतात. असे असताना वरळी, हजीअली परिसरात ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केला जात असल्याचा आरोप ब्रीच कँडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशी उमा रंगनाथन यांनी केला आहे.
उमा रंगनाथन म्हणाल्या, या आवाजामुळे रात्री झोपही मिळत नाही. याविरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार केली. मात्र, काहीही फायदा झाला नाही. पोलीस म्हणतात, पालिकेकडे तक्रार करा. मात्र, आरोपीकडेच आम्ही तक्रार कशी करू, असा सवालही त्यांनी केला आहे. आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली यांनीही कोस्टल रोडविरोधात तक्रारी वाढत असल्याची माहिती दिली आहे.
रात्रीच्या वेळेस निवासी परिसरात आवाजाची पातळी 45 डेसीबल असायला हवी. पण गेल्या काही दिवसांपासून रात्री परिसरात 80 डेसीबल इतका आवाज नोंदवला जात असल्याचे रहिवाशी पुराव्यानिशी रिडींग घेऊन सांगत आहेत. त्याच्या तक्रारी करत आहेत. पण तरीही पोलीस वा इतर संबंधित यंत्रणा काहीही करताना दिसत नाही, असा आरोप सुमेरा यांनी केला आहे.
हे आणखी काही काळ असेच सुरू राहिल्यास रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचा नक्कीच विपरीत परिणाम होईल, असे म्हटले जात आहे. तर याकडे असेच दुर्लक्ष झाले तर न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही आता रहिवासी देत आहेत. त्यामुळे, यावरुन भविष्यात वाद पेटण्याची शक्यता आहे.