मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 156 गणपती विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनसाठी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून बुकिंग करत येणार आहे. यापूर्वीचा अनुभव बघता आता बुकिंग दरम्यान कुठलाही काळाबाजार होणार नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.
अजित पवारांनी उठवला होता आवाज : कोकणातील चाकरमान्यांना गणपती उत्सवासाठी गावी जाता यावे यासाठी मध्य रेल्वेने 16 मे पासून विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू केले होते. बुकींगसाठी 23 मे पर्यंत वेळ देण्यात आला होता. हे आरक्षण 12 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यानच्या विशेष गाड्यांसाठी होते. परंतु 16 मे पासून सुरू झालेले आरक्षण अवघ्या काही मिनिटांतच फुल झाले. यावरून अनेक प्रवाशांनी नाराजगी व्यक्त केली होती. या प्रकाराबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार तसेच भाजप नेते नितेश राणे यांनी सुद्धा आवाज उठवला होता.
अधिकाऱ्यांचे व दलालांचे संगनमत : आता या 156 गणपती विशेष गाड्याचे आरक्षण मंगळवार 27 जून पासून सुरू होणार आहे. प्रवाशांना रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर जाऊन तिकीटांचे आरक्षण करता येणार आहे. मध्य रेल्वेच्या या घोषणेमुळे गणपती उत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी आरक्षणाचा कालावधी सुरु झाल्यानंतर तिकीट बुक होते की पूर्वीप्रमाणे काही मिनिटांतच फुल होते, याकडे चाकरमान्यांचे लक्ष असणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दलालांचा मोठा सहभाग असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. दलाल रेल्वेतील अधिकाऱ्यांबरोबर संगनमत करून तिकिटांचा काळा बाजार करतात असा आरोपही त्यांच्यावर आहे.
हेही वाचा :