मुंबई - पश्चिम असल्फा येथे 3 ऑक्टोबर रोजी सांयकाळी नाल्यात पडून जीव गमावलेल्या महिलेच्या दोन्ही मुलांच्या शैक्षणिक खर्चाकरीत मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्याबाबत भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शुभ्रशु दीक्षित यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शीतल भानुशाली (वय 32) ही महिला दळण दळण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी सांयकाळी असल्फा येथे गेली होती. मात्र, त्या दिवशी अचानक पावसाने मोठी मुसंडी मारल्याने असल्फा येथील नाला तुडुंब भरून वाहत होता. तर, सदर नाल्यावर झाकण नसल्याने ही महिला त्या नाल्यात पडली. 24 तासानंतर सदर महिलेचा मृतदेह हाजी अली येथील समुद्रात सापडला. या महिलेच्या पतीचे कपड्याचे दुकान असून त्यांना दोन मुलं आहेत. या मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक खर्चाकरिता आर्थिक मदत मिळावी यासाठी दीक्षित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत मागणी केली आहे. तसेच एल वार्डच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील शुभ्रशु दीक्षित यांनी या निवेदनातून केली आहे.
काय आहे घटना -
शीतल भानुशाली या 3 ऑक्टोबरला संध्याकाळी आपल्या मुलासह गिरणीमध्ये दळण घेऊन गेल्या होत्या. काही वेळाने त्यांनी मुलाला घरी पाठवून दिले आणि दळण दळेपर्यंत त्या गिरणीत थांबल्या. दळण घेऊन घरी येत असताना संध्याकाळी सातच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावर, चाळीत मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. या वेळी त्यांच्या कुटुंबाने फोनवर त्यांच्याशी संपर्क केला, तेव्हा पावसामुळे त्या एक ठिकाणी निवाऱ्याला उभ्या असल्याचे कळाले. मात्र, हा त्यांचा कुटुंबाशी हा शेवटचा संपर्क होता. त्यानंतर त्या रात्री घरी परतल्याच नाही. त्यांचे कुटुंब वारंवार त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्या आढळल्या नाहीत. अखेर कुटुंबीयांनी रात्री घाटकोपर पोलीस ठाण्यात त्या हरविल्याची तक्रार दाखल केली. सकाळी ते पुन्हा शोध घेऊ लागले असता त्यांना एका गल्लीत अर्धवट उघडलेल्या गटाराच्या झाकणाच्या बाजूला त्यांची दळणाची पिशवी पडलेली आढळली. हे गटार साधारणतः चार फूट खोल होते आणि त्यादिवशी त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणीदेखील वाहत होते.
हेही वाचा - #powercut : मुख्यमंत्री ठाकरेंची उर्जा मंत्री राऊतांशी चर्चा; वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना