मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिचा मृतदेह निर्वस्त्र आढळला होता, अशा प्रकारची माहिती सध्या व्हायरल होत आहे. मात्र, तसे काही नसल्याचे म्हणत मुंबई पोलिसांनी ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. सालियान यांच्या मृत्यूची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी दिशा यांच्या पालकांच्या उपस्थितीच पंचनामा केला होता, असे ठाकूर यांनी सांगितले.
८ जूनला सालियान यांचा मालाडमधील इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता, त्यानंतर सुशांत सिंह राजपूत याचाही मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला होता. या दोन घटनांवरून सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या घटनांचे राजकारण करणाऱ्यांवर टीका केली आहे. दिशा सालियानवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता, तिचे कुटुंबीय आधीच दुःखात असताना अशा प्रकारचे वक्तव्य हे दुर्दैवी असल्याचे राऊत म्हणाले.
दरम्यान, एका मुलाखतीमध्ये दिशाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीसोबत असे काहीही न झाल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सर्व कागदपत्रे दाखवली असून, ते त्यांचे काम चांगल्या प्रकारे करत असल्याचेही त्यांनी सांगितले.