मुंबई Uttam Pacharne Died : ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिल्पकार डॉ उत्तम पाचरणे यांचं निधन झालं आहे. गेल्या पाच दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र आज पहाटे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानं ललित कला अकादमीसह महाराष्ट्रातील कला क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
गेल्या पाच दिवसांपासून होते रुग्णालयात दाखल : ज्येष्ठ शिल्पकार डॉ उत्तम पाचरणे यांना मधुमेहाचा त्रास होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली होती. काही काळापूर्वी ते कोमात केले होते. मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर आज पहाटे संपली. त्यांच्या जाण्यानं कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे.
मालाडमधील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवलं पार्थिव : ज्येष्ठ शिल्पकार डॉ उत्तम पाचरणे यांचं आज सकाळी निधन झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसाला. डॉ उत्तम पाचरणे यांचं पार्थिव त्यांच्या मालाड पूर्वेतील निवासस्थानी दुपारी 2.00 वाजतापर्यंत अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तम पाचरणे यांची अंत्ययात्रा निघेल.
कर्जत तालुक्यात झाला जन्म : डॉ उत्तम पाचरणे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात झाला होता. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कलेच्या प्रांतात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. त्यांनी तब्बल 3 वेळा 'बॉम्बे आर्ट सोसायटी'चे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. गोवा इथल्या कला अकादमीचे ते अॅडव्हायजरी कमिटी सदस्य होते. पु ल देशपांडे राज्य ललित कला अकादमीच्या अॅडव्हायजरी कमिटीचेही ते सदस्य होते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्विल्झर्लंड बेल्जियम, नेपाळ, इस्रायल अशा अनेक देशांमध्ये त्यांच्या शिल्पाचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
हेही वाचा :