मुंबई - शहरात बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. बेस्टच्या परळ येथील वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे बेस्टच्या वसाहतीमधील हा कर्मचारी राहत असलेली इमारत पालिका आणि पोलिसांनी सील केली आहे. या इमारतीत राहणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
बेस्ट बस सेवेची परळ येथे कामगार वसाहत आहे. या वसाहतीत राहणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्याची मुलगी काही दिवसांपूर्वी त्यांची भेट घेण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्यात कोरोनाची लक्षणे नव्हती. परंतु, मुलगी पुन्हा आपल्या सासरी गेल्यावर तिला व तिच्या नवऱ्याला त्रास झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात मुलीला व तिच्या नवऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलीने आणि जावयाने बेस्ट वसाहतीमध्ये भेट दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वसाहतीतील संबंधित इमारत पालिकेने आणि पोलिसांनी सील केली आहे.
इमारत जंतुनाशकाद्वारे निर्जंतुक करण्यात आली आहे. तर, त्या कर्मचाऱ्यांसोबत रहात असलेल्या इमारतीतील इतर रहिवाशांचे विलगीकरण करण्यात आले आहे. परळ वसाहतीत व अन्य कोणाला ती मुलगी भेटली होती का, कोणाच्या संपर्कात आली होती का, याचा शोध पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी घेत आहेत. या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी माजी बेस्ट समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ व आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना ने-आण करण्याचे काम करत असल्याने महापौरांनी त्यांचे आभार मानले आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांची होणार तपासणी
शहरात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुमारे एक हजार वसाहती आहेत. कुलाबा, ससून डॉक, घाटकोपर, वडाळा, कुर्ला, सांताक्रुझ, मालाड, बोरिवली आदी ठिकाणी बेस्ट कामगारांच्या वसाहती आहेत. सध्या बेस्ट उपक्रमातील कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळे, त्यांच्या जिवाला कुठलाही धोका होऊ नये, यासाठी सगळ्याच वसाहतीतील कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणूने डोके वर काढले त्याच वेळेपासून कर्मचाऱ्यांमध्ये काळजी घेण्याबाबत मॅसेज, व्हॉट्सअॅप आदी माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितले.
हेही वाचा- 'संजय राऊतांनी या परिस्थितीत राजकीय उणीदुणी काढणे दुर्दैवी'