मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने व्यवहारावर बंधने घातली आहेत. या बंधनातून खातेदारांना लवकर दिलासा मिळावा आणि बँकेचे दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरळीत व्हावेत, यासाठी शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. या प्रकरणात न्यायालयाने मध्यस्थी करावी, अशी विनंती वायकर यांनी या याचिकेद्वारे कोर्टाला केली आहे.
दरम्यान, पीएमसी बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी राकेश वाधवा, सारंग वाधवा व वारीयम सिंग यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून आरोपींच्या पोलीस कोठडीत 16 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा - जास्त व्याजासाठी मुंबई महापालिकेची खासगी बँकांकडे धाव
पीएमसी बँकेचा एमडी जॉय थॉमस याच्या नावावर मुंबई- ठाणे येथे 4 फ्लॅट या पूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहेत. पुण्यात आणखी 9 फ्लॅट जॉय थॉमसच्या नावावर असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दिली. फक्त 3 लाख रुपये वेतन असताना जॉय थॉमस याने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यात 9 फ्लॅट कसे घेतले, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
पीएमसी बँकेच्या इतर संचालकांवरसुद्धा कारवाई केली जाण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. जॉय थॉमसच्या दुसऱ्या पत्नीला आर्थिक गुन्हे शाखा चौकशीसाठी बोलावणार आहे. आत्तापर्यंत या घोटाळ्याचा तपास करताना आर्थिक गुन्हे शाखेने 35 जबाब नोंदवले आहेत.