मुंबई - राज्यात म्हाडामध्ये लवकरच ६०० पदांची भरती करण्यात येणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. आज बुधवारी म्हाडात आयोजित औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळांतर्गत ९१७ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सुमारे १४ वर्षे म्हाडाला अध्यक्ष नसल्याने अनेक कामांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत बोलून दाखवली.
पुढे बोलताना सामंत म्हणाले 'राज्यात करण्यात येणाऱ्या भरतीमध्ये औरंगाबादेतील ३६ जागांचा देखील समावेश आहे. अत्यल्प अल्प उत्पन्न गटातील गोरगरीब जनतेचे हित समोर ठेवून म्हाडाने सदनिकांच्या किमती २० ते ४७ टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत. औरंगाबादेतील ९१७ सदनिकां करता यावेळी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.औरंगाबादेत तिसगावमध्ये २ बीएचके १६९ सदनिका, एमआयडीसी वाळूजमध्ये २४९ तर एमआयडीसी पैठण आणि देवळाईमध्ये वन बीएचकेच्या अनुक्रमे ९५ व ४०४ सदनिका उपलब्ध आहेत. 28 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करता येणार आहे. प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांची सोडत ४ एप्रिल रोजी तापडिया नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीनंतर कागदपत्रांची पूर्तताही ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार आहे.
शासनाने सिडकोची घरे फ्रीहोल्ड केली. याप्रमाणे म्हाडाची घरे फ्री होल्ड करा, अशी मागणीशिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अंबादास दानवे यांनी सामंत यांच्याकडे केली. त्यावर दानवे यांच्या मागणीबाबत विचार करू, असे आश्वासन सामंत यांनी यावेळीदिले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह म्हाडाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.