मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी स्वागत केले आहे. निकालानंतर त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ज्यामध्ये त्यांनी बहुमत चाचणीला जाण्याचा काही प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे बंडखोर आमदार बी. सी पाटील बोलत आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ११ बंडखोर आमदारही होते. सर्व बंडखोर आमदार मुंबईच्या रेनिसन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. परंतु, मध्यरात्री ते दिल्लीला निघाल्याची माहिती मिळत आहे.
उद्या कर्नाटक विधानसभेत राज्य सरकारला विश्वासदर्शक ठरावाने बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांविषयी दिलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामींची डोकेदुखी वाढली आहे. अनेक दिवसांपासून कर्नाटकात राजकीय वादळ उठले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे यामध्ये निर्णायक वळण घेणारी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.