मुंबई - राज्यात कोरोनामुळे अनेक शासकीय आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात शिक्षणाची चळवळ चालवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भरीव मदत देण्यात आली आहे. यासाठी रयत संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे.
शरद पवारांनी दिला धनादेश -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री सहायता निधी-कोविडसाठी 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला. पवार यांनी हा धनादेश सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
विविध विषयांवर झाली चर्चा -
राज्यभरात आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली.त्याविषयी पवारांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्याचे कळते. यासोबत राज्यात होत असलेल्या विधानपरिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदार संघाच्या अशा पाच जागांवर महाविकास आघाडीकडून विविध ठिकाणी उमेदवार दिले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत पवारांनी महाविकास आघाडीचा अजेंडा आणि त्यासाठीची रणानीती यावरही चर्चा केली असल्याचे सांगण्यात येते.
अर्णब प्रकरणीही झाली चर्चा -
अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. यामुळेच भाजपाकडून सरकारवर थेट निशाणा साधला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या प्रकरणात उडी घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून गोस्वामी यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. त्यावरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.