मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या बैठकीत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे बंड थंड करण्यात यश आले आहे. जालना मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच लढवणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत राज्यातल्या ४८ मतदार संघांचा आढावा घेण्यात आला. तसेच जालना आणि किरीट सौमय्या यांच्या ईशान्य मुंबई मतदार संघाबाबतही चर्चा करण्यात आली. जालना आणि ईशान्य मुंबई हे दोन्ही मतदार संघ भाजप लढवणार आहे. सौमय्या यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध केला तरी सौमय्या यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
शिवसेना-भाजपच्या युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाने फोडला जाणार आहे. राज्यात १५,१७,१८ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि नवी मुंबईत संयुक्त मेळावे होणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत जालना मतदार संघाबाबत तिढा सुटल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अद्याप अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. खोतकर यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.