मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की गेल्या पंचात्तर वर्षात देशातील प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे देशात परिवर्तन आणायचे असेल तर तिसऱ्या फ्रंटची किंवा विरोधी पक्षांची मजबूत आघाडी असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखया पक्षांना एकत्र येण्याची विनंती केली आहे. शिवसेनेने केसीआर यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेतली आहे. मात्र काँग्रेसला बाजूला ठेवून विरोधी पक्षांची आघाडी करणे आणि भाजपाला पराजित करण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे केवळ कल्पना असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
काँग्रेसला दूर ठेवता येणार नाही- नितीन राऊत
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा केली. याबाबत आम्हाला काहीही आक्षेप नाही. मात्र हे दोन्ही पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत हे केसीआर यांनी लक्षात घ्यावे, या पक्षांची ताकद मर्यादित आहे. भाजपाला टक्कर द्यायची असेल तर देशभरात सर्वत्र असलेल्या काॅंग्रेसला सोबत घेतल्याशिवाय हे शक्य होणार नाही. म्हणून जर अशी काही विरोधकांची आघाडी करायची असेल तर काँग्रेसला वगळता येणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उर्जा मंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी दिली आहे.
काँग्रेसने अहंकार सोडून पुढाकार घ्यावा- भावसार
भाजपा विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट करण्याचा प्रयत्न सुरु आहे यासाठी काँग्रेसने सोबत येण्याची या पक्षांनी वारंवार विनंती केली आहे. मात्र भाजपाची पुन्हा सत्ता आली तर आपले विरोधी पक्ष नेतेपद गमवावे लागेल का या भीतीने काँग्रेस विरोधकांच्या आघाडीत सहभागी व्हायला तयार होताना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसने अहंकार सोडून या प्रादेशिक पक्षांसोबत एकत्र आल्यास भाजपाला सक्षम पर्याय निर्माण होऊ शकतो, काँग्रेस सोबत आली नाही तरीसुद्धा या पक्षांनी एकत्र आल्यास निश्चित प्रभाव पडू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.