मुंबई - लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने गरिबांसाठी रास्त दराने अन्नधान्य पोहोचावे, यासाठी बरेच उपाय केले आहेत. तर दुसरीकडे अन्न-धान्य पोहचवणारे कंत्राटदार मात्र या कार्यात उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.
मुंबईत कुर्ला भागातील अंतर्गत काही रेशनच्या दुकानात 30 दिवसापासून माल आला नाही. या संदर्भात कंत्राटदार आणि उपकंत्राटदार यांच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत 50 किलोच्या गोणीमागे 20 रुपये हमाली मागत असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात ही सेवा निःशुल्क आहे. यामुळे पुष्कळ ठिकाणी माल जात नाही आणि शासनाची बदनामी होते.
कंत्राटदार यांचे कंत्राट रद्द करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांना मदत करणा-या अधिकारी वर्गावर कारवाई करावी, अशी मागणी प्रामुख्याने गलगली यांनी केली आहे.