मुंबई : पीडित महिलेने तिच्या पती आणि सासर मंडळी यांच्याविरोधात बलात्कार, काळी जादू आणि घरगुती हिंसाचाराची तक्रार केली होती. तिला सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना एका लेडी कॉन्स्टेबलने सुमारे 2 किमी पायपीट करायला लावली असल्याचा आरोप महिलेचे वकील नितीन सातपुते यांनी मंगळवारी केला आहे.
बलात्काराची तक्रार दाखल: पीडितेने तिचा अनिवासी भारतीय नागरिक असलेल्या (एनआरआय) पती, तांत्रिक, तिचा दीर आणि इतर नातेवाईकांविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. लग्न झाल्यापासून तिच्यावर वारंवार बलात्कार, छळ आणि इतर प्रकारचे अत्याचार होते. खूप प्रयत्न केल्यानंतरच पीडित महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन भोईवाडा पोलीसांनी काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला. मंगळवारी परळच्या केईएम रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी होणार होती, असे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले.
निर्भयाची वाहने कुठे?: एका महिला कॉन्स्टेबलने तिच्याकडे टॅक्सीचे भाडे मागितले. वकील असलेल्या पीडित महिलेकडे पैसे नव्हते. त्यामुळे महिला कॉन्स्टेबलने तिला तिथून 2 किमी चालत बीएमसीच्या केईएम रुग्णालयात तिच्या वैद्यकीय उपचारासाठी नेले, अशी माहिती वकील सातपुते यांनी दिली. वकील नितीन सातपुते यांनी अशा बलात्कार पीडितांसाठी असलेली निर्भयाची वाहने कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला आहे. आरोपींना पोलीसांच्या वाहनात फिरवून वैद्यकीय चाचणीसाठी कसे फिरवतात असा प्रश्न देखील वकील सातपुते यांना उपस्थित केला आहे.
पीडित महिलेकडे पैशांची मागणी: सातपुते यांनी ही बाब पोलीस उपायुक्त (झोन 4) प्रवीण मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिली. ते पोलिसांची बाजू ऐकण्याची वाट पाहत आहेत. महिला पोलीस कॉन्स्टेबलने टॅक्सीने केईएम रुग्णालयात नेण्यासाठी पीडित महिलेकडे पैशांची मागणी केली. मात्र, वैद्यकीय तपासणीसाठी जाताना टॅक्सीचे भाडे देण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याचे पीडितेने सांगितले. त्यानंतर पीडित महिलेला भोईवाडा पोलीस ठाण्यापासून केईएम रुग्णालयात पायी चालत जाण्यास भाग पाडले.