मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाविषयी चर्चा गेल्या काही काळापासून सतत सुरू आहेत. पुन्हा एकदा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चांना जोर आला आहे. कारण, दोघांना जोधपूरमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. त्यांना पापराझींनी कॅमेऱ्यात कैद केले आहे.
जोधपूरमध्ये रणबीर-आलिया हॉटस्पॉट
आलिया आणि रणबीर जोधपूर विमानतळाच्या बाहेर दिसले. यादरम्यान, आलियाने जीन्ससह क्रॉप टॉप आणि ग्रीन-व्हाईट जॅकेट घातले होते. त्याचवेळी रणबीर ब्राऊन कलरच्या आउटफिटमध्ये होता. त्याने सनग्लासेस घातले होते. फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर रणबीर-आलियाचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर ते लग्नासाठी हॉल पाहण्यासाठी आले असतील, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
रणबीरचा वाढदिवस 28 सप्टेंबरला
आतापर्यंत रणबीर-आलियाच्या दोन्हीही कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. रणबीर कपूरचा वाढदिवसही 28 सप्टेंबरला आहे. अशा परिस्थितीत हे देखील होऊ शकते की तो आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे आला आहे. या जोडप्याच्या लग्नाची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशा चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वीही रंगल्या चर्चा
2021 च्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आलिया आणि रणबीर त्यांच्या कुटुंबीयांसह जयपूरला गेले होते. त्यावेळीही असे म्हटले गेले की ते लग्नाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी आले होते. मात्र त्या चर्चा निष्फळ ठरल्या. कारण ते तिथे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेले होते.
दोघेही कामात व्यस्त
आलिया आगामी 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'आरआरआर' चित्रपटात दिसणार आहे. तर दुसरीकडे, रणबीरकडे 'शमशेरा' आणि 'अॅनिमल' सारखे मोठे चित्रपट आहेत. दोघेही 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यशराज फिल्म्सने घोषणा केली की मुंबईत सिनेमा हॉल सुरू झाल्यावर 'शमशेरा' 18 मार्च 2022 रोजी रिलीज होईल.
हेही वाचा - 'ओ शेठ..' गाणं गायकानेच चोरल्याचा संगीतकरांचा आरोप