मुंबई - 'वेळ कसा काढावा आणि सगळं करुन नामानिराळं कसं राहावं' याच्यावर एखादं पुस्तक लिहा, असा टोला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. हे पुस्तकंही लिहतात, भाषणही करतात, राजकारणही करतात त्यांना वेळ कोठून मिळतो ही शंका मला तुमच्या पत्नीला विचारायचे असल्याचे रामराजे म्हणाले. आम्हाला तुम्ही बजेट समजावून सांगता मात्र, टीव्हीवरील रिपोर्टर्स आणि अँकर्स यांना बजेट समजावण्यासाठी तुम्ही कधी पुस्तक लिहणार असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामराजे बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री, आमदार उपस्थित होते.
पारावरचा जीडीपी निर्मला सीतारमन यांनाही समजणार नाही
जीडीपी म्हणजे काय हे गावच्या सरपंचाला माहीत नसते, परंतु तो आता बघायला लागला असल्याचे रामराजे म्हणाले. पारावरचा जाडीपी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनाही समजणार नसल्याचे रामराजे म्हणाले. तारांकित प्रश्नावरही एक पुस्तक आपण लिहावे असा सल्लाही रामराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. कारण एक आमदार तारांकित प्रश्नावर १० मिनिटे बोलतो, त्यातील ८ मिनिटे आमदार तो प्रश्न 'डेव्हलप' करत असतो. ते 'डेव्हलप' म्हणजे काय? हे मला आयुष्यात आत्तापर्यंत कळले नसल्याचे रामराजे म्हणाले.