मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी रिपाई नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सेना-भाजप युतीकडे 10 जागांची मागणी केली आहे. या दहा जागांमधील सहा ते सात जागा भाजप-सेना आम्हांला निश्चित सोडतील, अशी अपेक्षा त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
हेही वाचा- चार आठवड्यात फूड कमिशनची स्थापना न केल्यास मुख्य सचिवांवर कारवाई - उच्च न्यायालय
आठवले म्हणाले, की आम्ही २३ जागा मागितल्या आहेत, पण आम्हाला आता १० जागा भाजपने द्याव्यात. त्यात आम्हाला भाजपसोबत सेनेनेपण जागा सोडल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आम्हाला भाजपने मागील वेळेस ८ जागा दिल्या होत्या, आम्ही त्या लढलो होतो. आता आम्हाला १० जागा दिल्या पाहिजेत. आपण ज्या २३ जागांची अपेक्षा केली आहे, त्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासोबत मुंबईत चेंबूर धारावी, चांदिवली, मालाड, तसेच ठाण्यातील अंबरनाथ, उल्हासनगर आदी जागा असल्याचे आठवले म्हणाले.
हेही वाचा- काळानुसार बदलले नाही तर गोष्टी बंद पडतात - उद्धव ठाकरे
राज्यात विधानसभा निवडणुकीत आम्ही मित्र पक्ष सर्व एकत्र आलो तर राज्यात आम्हाला विधानसभेत २४० जागा मिळतील असेही भाकीत त्यांनी व्यक्त केले. राज्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये कोणी राहायला तयार नाहीत, सगळे सेना-भाजप मध्ये येत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आता निवडून येण्याची खात्री त्यांना उरली नाही. सगळे राजे, महाराजे भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे भाजपाला मी विनंती करतो की, आता या सगळया लोकांना घेऊ नका. काही लोकांना आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या तिकिटावर निवडून आणू ,अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा- ‘स्वाभिमान’ हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत असतानाच आठवले यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले, की काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या लोकांसोबत घात केला. पाकव्याप्त काश्मीर आमचाच आहे. मात्र काँग्रेसने येथे दहशतवाद वाढवला. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आत्तापर्यंत ४१ हजार लोकांची हत्या झाली आहे. त्यामुळे मोदींचा ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय लोकांना आवडला असल्याचे आठवले यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने आठवले यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. मोदी हे, २०२४ मध्येही पंतप्रधान व्हावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मोदी यांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देशात जातीच्या आधारावर जनगणना व्हावी, अशी माझी मागणी आहे. त्यामुळे जातीची संख्या कळेल. त्यामुळे २०२१ ची जनगणना ही जातीच्या आधारावर करावी, अशी माझी मागणी असल्याचे ते म्हणाले. राज्यात सध्या सेना-भाजपमध्ये एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोपांवर आठवले म्हणाले की, मी जोर्यंत आहे, तोपर्यंत मी सेना भाजपाला वेगळे होऊ देणार नाही. त्यांची युती कायम राहील. ते वेगळे झाले तर मी वेगळा होईन, असेही त्यांनी विधान केले.