मुंबई- राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक सेवा पूर्वपदावर आणल्या आहेत. मात्र, राज्यातील धार्मिक स्थळे मात्र बंद आहेत. याचा मोठा फटका यावर अवलंबून असणाऱ्यांना बसत आहे. यामुळे राज्यातील सर्वधर्मिंयांची धार्मिक स्थळे सुरू करावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उचलून धरली आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता आठवले यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबरला यासाठी मुंबईत आंदोलन करण्यात येणार असून सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश करत आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोना-लॉकडाऊनमुळे मागील साडे पाच महिन्यापासून धार्मिक स्थळे बंद आहेत. अनलॉक 4 मध्ये धार्मिक स्थळे सुरू होतील अशी आशा होती. राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंदच ठेवली आहेत. दरम्यान, धार्मिक स्थळे उघडावीत या मागणीसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आंदोलन केले होते. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यात आता आठवले यांनी ही यात उडी घेतली आहे. मुंबईसह राज्यातील मंदिर-मस्जिद-चर्च-विहार-गुरुद्वारा सुरू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळत धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
हेही वाचा-मुंबईत सेरो सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण; ५,८४० जणांची तपासणी
आरपीआयकडून 9 सप्टेंबरला आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आठवले यांनी आज प्रसारमाध्यमाना दिली आहे. मुंबईसह राज्यभर विविध ठिकाणी आरपीआयचे कार्यकर्ते आंदोलन करत धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी करणार आहेत. आठवले प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदीर येथे आंदोलन करणार आहेत. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे न उघडण्याची राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. तर आता दुसरीकडे राजकीय पक्षांकडून धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी दबाव आणला जात आहे, आंदोलने केली जात आहेत. तेव्हा राज्य सरकार आता यापुढे काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.