मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज (रविवार) देशभर 'जनता कर्फ्यू' लागू करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनोख्या शैलीत कविता म्हणत नागरिकांना घरात बसून राहण्याचे आवाहन केले.
'कुणी काढू नका आज आपली वरात, सर्वांनी दिवसभर बसून रहा आपल्या घरात, बाहेर पडू नका सकाळी 7 ते रात्री 9 अशा दिवसभरात, कारण आज आपल्याला राहायचं आपल्या घरात' असे म्हणत रामदास आठवलेंनी नागरिकांना घरात बसून राहण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घरात बसून आहेत. अगदी सेलिब्रिटीपासून राजकीय नेत्यांनांही घरी बसावं लागत आहे. त्यानुसार आठवलेही रविवारचा दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवत आहेत. आपल्या आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे घरात इतका वेळ बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. पण 'गो कोरोना, नो कोरोना' म्हणत या संकटातून बाहेर पडण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मी घरी बसलोय तुम्हीही घरी बसा असं आवाहन रामदास आठवले यांनी केले.
सकाळी कुटुंबासोबत नाश्ता केल्यानंतर आपण सर्व वृत्तपत्र वाचून काढली. मुलांसोबत गप्पा मारल्या. आता पुढचा संपूर्ण दिवस घरातच राहणार असल्याचे आठवलेंनी सांगितले. पण संध्याकाळी 5 वाजता मात्र, बाहेर येऊन कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आमच्या सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे या सर्वांसाठी टाळी वाजवणार असल्याचेही आठवले म्हणाले.