मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी देशभरात देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. 1 जून पासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नाही आहे, त्यामुळे गर्दी टाळा,असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राम कदम यांनी यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. दहीहंडीला होणारी हजारो लोकांची गर्दी पाहता यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
गणेशोत्सवापाठोपाठ आता दहीहंडीवर देखील कोरोनाचे सावट आले आहे. राम कदम यांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मोठी दहीहंडी अशी ओळख त्यांच्या दहिहंडीची आहे. घाटकोपर परिसरात दहीहंडी उत्सवाच आयोजन करण्यात येते. यावेळी मोठी ही गर्दी होते ही टाळण्यासाठी तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जनहिताचा विचार करून दहीहंडीचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतल्याचे राम कदम यांनी सांगितले आहे.
कोरोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता घाटकोपरला होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती कदम यांनी ट्विटमध्ये दिली आहे
मुंबईत दहीहंडी हा उत्सव जल्लोषाने साजरा केला जातो. या उत्सवासाठी गोविंदा पथक 2 महिने मेहनत घेतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.