मुंबई - एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असून नाराजीमध्ये ते जरी काहीही बोलले, तरीही ते पक्ष सोडून कधीही जाण्याचा विचार करणार नाहीत, असे मत भाजप आमदार राम कदम यांनी व्यक्त केले आहे. भाजपच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक आज दादरमधील वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.
हेही वाचा - स्थगिती सम्राट मुख्यमंत्री, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत. अगदी अखेरच्या विधानसभा अधिवेशनात बोलतानाही त्यांनी आपल्याच सरकारला लक्ष्य केले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना वगळून त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाला पक्षातील काही नेते कारणीभूत असल्याचा आरोप खडसेंनी केला. त्यानंतर पक्षाच्या सुकाणू समितीमधूनही त्यांची गच्छंती करण्यात आली. त्यामुळे आपल्याला सगळ्याच बाबतीत डावलले जाणार असेल, तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असे मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता त्यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते ते पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, अशी सावरासावर करत आहेत.
हेही वाचा - वाडिया रुग्णालयाला महापालिकेकडून 13 कोटींचा निधी
पक्षात ओबीसी नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? यावर बोलताना पक्षात आजही 37 आमदार हे ओबीसी आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षावर आजही विश्वास कायम असल्याने, असा काही प्रयत्न सुरू आहे, हे चुकीचे आहे, असे कदम यांनी सांगितले. तर दुसरीकडे आपल्यातील काही लोक फुटतील या भीतीने ग्रासलेले महाआघाडीचे नेतेच अशा अफवा पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले.