मुंबई : अभिनेत्री, मॉडेल राखी सावंत हिच्या आईला ब्रेन ट्युमर आणि कॅन्सर झाल्याचे राखी सावंतनेच सोशल मीडियावर लाईव्ह करून सांगितले होते. नंतर आईची तब्येत बिघडत असल्याचे देखील राखीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. आज राखीची आई जया सावंत यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. गेले अनेक दिवस मृत्यूशी लढत असलेली लढाई जया सावंत हरल्या आहेत. त्यांचे अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात निधन झाले आहे.
राखीने दिली होती माहिती - बिनधास्त वागण्यामुळं सतत चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर राखी सावंत ही मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर आली. घरातून बाहेर पडताच एका बातमीने तिला हादरवून टाकले होते. राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सर झाला असून, ती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर आले होते. राखीच्या आईची तब्येत दिवसेंदिवस खालवत होती. आज राखीच्या आईचे निधन झाल्याने राखीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राखीच्या आईचे निधन - राखीने स्वत: रुग्णालयातून लाइव्ह करून आईच्या आजारपणाची माहिती दिली होती. आईच्या आजारपणाची माहिती देताना राखी रडताना दिसत होती. 'मी रात्री बिग बॉस मराठीमधून बाहेर पडले. मला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. माझ्या आईची तब्येत बरी नाही. ती रुग्णालयात आहे. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. माझी आई कॅन्सरशी लढत आहे. मला कुणीही सांगितलेही नव्हते. आताच मला माहिती मिळाली की तिला ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सर झाला आहे. तिच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून प्रार्थना करावी, असे आवाहन तिने चाहत्यांना सोशल मीडियावर केले होते.
जया सावंत यांची खालावली होती तब्येत - राखी लाइव्ह व्हिडिओ करत असताना तिची आई हात हलवून काहीतरी सांगताना दिसत होती. राखी तिला थांबवताना दिसत होती. राखीच्या आईचा कॅन्सर फुफ्फुसांत पसरला असून तिला रेडिएशन द्यावे लागणार आहे. शस्त्रक्रियेनं कॅन्सर बरा होणार नसल्याचे डॉक्टरांच्या हवाल्याने राखीने सांगितले होते. विविध चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर नेमके किती रेडिएशन द्यावे लागणार आहे हे कळेल, असे ती सांगताना दिसत होती.
सलमान खानने केली होती मदत - राखी सावंत २०२१ मध्ये बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाली होती. तेव्हा देखील राखीची आई जया सावंत ही रुग्णालयात होती. त्यावेळी देखील तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. सलमान खान आणि त्याच्या भावांनी राखीच्या आईवर सर्वोत्तम डॉक्टरांकडून उपचार करून घेऊन तिला मदत केली होती. त्यावेळी तिच्या आईची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. यावेळी आईच्या उपचारासाठी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मदतीचा हात दिला होता.