मुंबई - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जोगेश्वरी येथील श्रुतिका घाग या तरुणीने नवा विक्रम रचला आहे. स्वराज्याला दिशा दाखवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र तिने साडीवर रेखाटले आहे. ही साडी १२५ फुटांची आहे. जोगेश्वरी शामनगर येथील इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या सभागृहात ही कलाकृती तयार करण्यात आली.
राजमाता जिजाऊ यांनी केलेला संघर्ष युवापिढीला कळावा, यासाठी श्रुतिका घाग हिने १२५ फुटांच्या साडीच्या माध्यमातून ३६ प्रसंग रेखाटले आहेत. जिजाऊ यांच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या प्रसंगाचा यात समावेश आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी श्रुतिका हिने १ वर्षांपासून अभ्यास सुरू केला. तिने छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्यावर आधारित पुस्तकांचा अभ्यास केला. त्यातून काही महत्त्वाचे प्रसंग तिने शोधून काढले. ही कलाकृती तिने ११४ तासात पूर्ण केली. यासाठी तिने काळ्या, सोनेरी, लाल रंगछटांचा वापर केला आहे. या अनोख्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. शिवाजी महाराज आणि जिजामाता ३६ पोर्ट्रेट या साडीवर रेखाटले आहेत.
आपल्या कलाकृतीबाबत बोलताना श्रुतिका म्हणाली, की मी सोफिया पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी असून टेक्सटाईल डिसाईन क्षेत्रात ती ५ वर्षे कार्यरत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ याना मानवंदना म्हणून मी कलाकृती साकारली आहे. यासाठी मी गेल्या १ वर्षांपासून काम करत आहे. अनेक इतिहास आणि जाणकारांचा सल्ला यासाठी घेतला. जिजाऊ यांचा फोटो कोठे उपलब्ध नसल्यामुळे थोडा त्रास झाला. शिवाजी महाराज यांचा लंडन येथील संग्रहालयात असलेला फोटो यासाठी वापरण्यात आला आहे. वयानुसार हा फोटो बघून महाराजांच्या चेहऱ्यात बदल करण्यात आला आहे. मी ठरवले होते, की माझ्या क्षेत्रात काही तरी विश्वविक्रम करायचा, मग मी काम सुरू केले. सुरुवात कशी करायचे ते कळत नव्हते. मात्र, त्यानंतर युवा कलाकार चेतन राऊत यांच्या मार्गदर्शनाने ही कलाकृती साकार झाली. ३६ विविध प्रसंग यात मांडण्यात आले आहेत. जिजाऊ यांचा जन्म, तलवार बाजी, शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराज यांच्या हाती जिजाऊ यांनी दिलेली तलवार, युद्ध नीती, गावकऱ्यांना जिजाऊ यांनी जमिनी परत दिल्या. सखी प्रथा मोडीत काढली. असे काही प्रसंग यात रेखाटले आहेत. ही कलाकृती रविवारपर्यंत सर्वांना पाहता येणार आहे, असे श्रुतिका यांनी सांगितले.