मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसेचे हे अधिवेशन सुरू होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून मनसे आपला झेंडा बदलणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेवर आज पडदा पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्यांचे अनारण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज डॉ. सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे या प्रतिमांबरोबरच वि. दा. सावरकर यांचीही प्रतिमी होती. मनसेच्या कार्यक्रमात प्रथमच सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे.
राज ठाकरेंनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. हा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर शिवरायांची 'राजमुद्रा' आहे. या झेंड्यावर राज्यातून काय प्रतिक्रिया येतात ते आता पाहावे लागेल. मराठा क्रांती मोर्चाने या झेंड्याबाबत आक्षेप नोंदवला होता. तरीही मनेसेने आपल्या नव्या झेंड्यावर राजमुद्राच ठेवली आहे. त्यामुळे मनसे आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.