मुंबई : राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवर निशाणा साधला आहे. तसेच, 'सध्याचे वातावरण पाहता महानगरपालिकांच्या ऐवजी लोकसभेच्या निवडणुका प्राधान्याने लागतील', असे ते म्हणाले. या आधी त्यांनी अजित पवार हे भाजपासोबत गेल्याने लवकरच राष्ट्रवादीची दुसरी टीमही भाजपासोबत जाईल, असे सूचक ट्विट केले होते.
हे सगळे २०१४ पासून एकत्र : 'मी यापूर्वीच सांगितले आहे की, भाजपासोबत गेलेली राष्ट्रवादीची ती पहिली टीम आहे. उर्वरित टीमही लवकरच तिकडे जाणार आहे. हे सर्व आतूनच चालू आहे. हे काही आजचे नाही. २०१४ पासून हे सर्व लोक एकत्र आलेले आहेत. पहाटेचा शपथविधी आठवत नाही का?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, 'शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायला 'चोरडिया' या नावाच्या ठिकाणीच जागा मिळावी ही पण कमाल आहे', असा चिमटाही राज ठाकरेंनी काढला.
आता थेट लोकसभेच्याच निवडणुका लागतील : 'सध्याचे वातावरण पाहता आता महापालिकेच्या निवडणुका लागतील असे वाटत नाही. सध्या जो काही राजकीय घोळ झाला आहे, त्यामुळे निवडणुका लावून कोणी पायावर धोंडा पाडून घेणार नाही. आता ज्या निवडणुका लागतील, त्या लोकसभेच्याच लागतील. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघात चाचपणी करणार आहोत. तिथे आमची टीम जाईल आणि हे काम करेल', असे राज ठाकरे म्हणाले.
पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला : यावेळी बोलताना राज ठाकरेंनी युतीच्या चर्चांवरही उत्तर दिले. सर्वच बाजुंनी कन्फ्युजन आहे. परंतु हळूहळू हे सर्व दूर होईल. कोण कोणासोबत आहे हे समजत नाही. ज्याप्रमाणे माणूस उलटा फिरला की त्याच्या शर्टाचे लेबल दिसते, तेव्हाच समजते की तो कुठल्या पक्षासोबत आहे, असा टोला राज ठाकरे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला आहे. आपल्यालाही भाजपची ऑफर होती. मात्र आपण अजूनही कोणताच निर्णय घेतला नसल्याचे ते म्हणाले. आधीच शिंदे-पवार जवळ केलेत त्यात काय करायचे असा मोठा प्रश्न आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच परवा पनवेलला मेळावा आहे. त्यावेळी मुंबई-गोवा रस्त्याच्या दुरावस्थेवर बोलेन, असे राज ठाकरेंनी सांगितले.
हेही वाचा :