मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील बंगल्यावर आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर काही वेळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बंगल्यावर येऊन शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट 8 मिनिटे चालली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सत्तास्थापनेसाठी सकारात्मक चर्चा घडवा, अशी विनंती पवार यांना केली असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा - दिल्लीतील बैठकीत सत्तास्थापनेसाठी चर्चा होईल असे वाटत नाही - जयंत पाटील
शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या आठ मिनिटाच्या भेटीमध्ये सुरूवातीला राज्यातील सत्ता स्थापनेवर आणि त्यानंतर दुष्काळावर ही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी शरद पवार हे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असून या भेटीवर सर्वाधिक चर्चा झाली असून राज्यात सत्ता स्थापनेसाठी आपणच आता पुढाकार घेऊन त्यासाठी सकारात्मक चर्चा घडवून आणावी अशी विनंती राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा - हीच ती वेळ..! शिवसेनेला छगन भुजबळांनी दिला 'हा' सल्ला
विधानसभेचे निकाल जाहीर होऊन आता आठ दिवस उलटून गेल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी सेना-भाजपमध्ये अद्यापही वाद मिटला नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना सत्तास्थापन करत असेल तर त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यासाठी अंतिम भूमिकाही ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दिल्लीतील पवार आणि गांधी यांच्या बैठकीतून समोर येणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - राष्ट्रपती राजवट ही संविधानातील कायदेशीर प्रक्रिया - आमदार राम कदम
त्यातच शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा म्हणून दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदींनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले असून शिवसेना सत्ता स्थापन करत असेल तर त्यासाठी पवारांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी गळ राज ठाकरे यांनी पवारांकडे घातली असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - सत्ता स्थापनेचा तिढा 9 तारखेपर्यंत सुटेल - गिरीश महाजन