मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. तेव्हापासून कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र, आता पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी गेल्या महिन्याभरात आजारांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
मुंबईत कोरोनाचे 7 लाख 37 हजार रुग्ण -
मुंबईत सोमवारी (9 ऑगस्ट) कोरोना विषाणूचे 208 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 37 हजार 724 वर पोहोचला आहे. आज 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 954 वर पोहोचला आहे. आज 372 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 15 हजार 389 वर पोहोचली आहे.
मुंबईत 3 हजार 961 सक्रिय रुग्ण -
मुंबईत सध्या 3 हजार 961 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1680 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेली 1 चाळ आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 35 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत एकूण 84 लाख 39 हजार 521 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई 2 ऑगस्टला 259, 9 ऑगस्टला 208 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आधी 1 फेब्रुवारीला 328 तर 2 फेब्रुवारीला 334 तर 26 जुलैला 299 रुग्णांची नोंद झाली होती, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पावसाळी आजारांची रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही केली जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसात पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. जून २०२१ मध्ये मुंबईत मलेरियाचे ३५७ रुग्ण होते. जुलैमध्ये ही रुग्णसंख्या ५५७ वर गेली आहे. लेप्टो रुग्णांची संख्या १५ वरून ३७, डेंग्यू १२ वरून २८, गॅस्ट्रो १८० वरून २९४ तर ‘एच१एन१’च्या ६ रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली. २०२० मध्ये वर्षभरात मलेरियाचे ५००७ रुग्ण आढळले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे २४० रुग्ण ८ मृत्यू, डेंग्यूचे १२९ रुग्ण ३ मृत्यू आणि गॅस्ट्रोचे २५४९, ‘एच१एन१’चे ४४ रुग्ण आढळले होते. यावर्षी १ जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत गॅस्ट्रोचे एकूण २३१८, लेप्टोचे ९६, डेंग्यूचे ७७, गॅस्ट्रोचे १५७२ तर ‘एच१एन१’चे २८ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
पालिका सज्ज -
मलेरियाचे जुलै २०२० मध्ये ९५४ रुग्ण आढळले होते. मात्र, यावर्षी जुलैमध्ये मलेरियाचे ५५७ रुग्ण आढळल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात रुग्ण कमी आढळले आहेत. पावसाळी आजारांसाठी पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर अशा प्रमुख रुग्णालयांसह कस्तुरबासह सर्व १६ उपनगरीय रुग्णालये व इतर रुग्णालयात पावसाळी आजारांसाठी बेड उपलब्ध आहेत. गंभीर आजारी रुग्णांसाठीही आवश्यक असणारी सर्व औषधे पालिकेकडे उपलब्ध आहेत. तसेच रुग्णालय, घरोघरी आणि रॅपिड टेस्टच्या माध्यमातून चाचण्याही केल्या जात असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन -
दरवर्षी जुलैमध्ये होणार्या अतिवृष्टीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा उपद्रव वाढून मलेरियासारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. यावर्षीही पावसाळी आजार वाढले आहेत. पावसाळी आजार वाढल्यामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. शिवाय घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये. परिसर स्वच्छ ठेवावा, असेही पालिकेने म्हटले आहे. मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार आजही आहे. कोरोना अद्याप गेलेला नाही. यामुळे नागरिकांनी मास्क घालणे, सतत हात धुणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पावसाळ्यात 'या' आजारांचा धोका -
पावसाळा आणि आजार हे एक समीकरणच आहे. दरवर्षी पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, कावीळ, उलटी, जुलाब, सर्दी-ताप-खोकला, दमा असे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या आजाराचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वांनाच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाताना उंदीर चावल्यास वा पायाला जखम असेल आणि त्यात उंदिराची विष्ठा-मूत्र असलेले पाणी गेल्यास लेप्टोस्पायरोसिस आजार होतो. हा आजार घातक मानला जातो आणि यावर वेळेत उपचार घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात घरात वा घराबाहेर कुठेही पाणी साचले तर त्यातून डासांची उत्पत्ती मोठ्या संख्येने होते. हेच डास चावून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार होतात. महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते. तेव्हा असे दूषित पाणी पिल्याने उलटी-जुलाब आणि कावीळ होते. त्याचवेळी पावसाळ्यात हवा दमट होते. या दमट हवेमुळे दमा आणि इतर श्वसनाचे आजार असलेल्याचा त्रास वाढतो वा श्वसनाचे आजार होतात अशी माहिती डॉ भोंडवे यांनी दिली आहे.
दुहेरी संकट -
पावसाळ्यात दरवर्षी पावसाळी आजारापासून वाचण्यासाठी नागरिकांना काळजी घ्यावी लागते. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांसमोरही या आजारांना रोखण्याचे आव्हान असते. मात्र, आता मागील वर्षांपासून हे आव्हान दुहेरी झाले आहे. कारण कोरोना महामारीत पावसाळी आजार असे हे आव्हान उभे ठाकले आहे. कोरोना हा श्वसनाचा आजार असून यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आणि इतर आजार होण्याची शक्यता जास्त असते. डेंग्यू, मलेरिया वा इतर पावसाळी आजार झालेल्याना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त असते. एकाच वेळी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारासोबत इतर आजार झाल्यास हे अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळतानाच पावसाळ्यात घ्यावी लागणारी काळजी अधिक काटेकोर पणे घेणे आता जास्त गरजेचे आहे. त्यातही लहान, वृद्ध आणि गर्भवतींची अधिक काळजी घ्यावी लागते.
'ही' घ्या काळजी -
सध्या कोरोना महामारीचा काळ आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टनसिंग, स्वच्छ हात धुणे आणि कोरोना प्रतिबंधक सर्व नियम कडक पाळणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात पाण्यात जाऊ नये. खूपच आवश्यक काम असल्यास बूट, रेनकोट घालूनच बाहेर पडावे. घरात वा घराबाहेर डबके होणार नाही, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. डास होणार नाहीत याची काळजी घ्यावी. संध्याकाळी खिडक्या बंद ठेवाव्यात, रात्री झोपताना हातपाय झाकून झोपावे, जेणेकरून डास चावणार नाही. कारण डेंग्यूचे डास पहाटे आणि संध्याकाळी चावतात. हाताला आणि पायालाच डेंग्यूचा डास चावतो असेही डॉ भोंडवे सांगतात. दूषित पाण्यामुळे ही आजार होत असल्याने पाणी उकळूनच प्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे ताप-सर्दी वा इतर लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा असा सल्ला ही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - 2012 नंंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला आहे का?- मनसे नेते संदीप देशपांडे