मुंबई - राज्यावर अनेकदा दुष्काळाचे संकट ओढवते. पण जेव्हा पाऊस सुरू होतो, तेव्हा ते पाणी साचवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. आता यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून शासनाच्या दीड लाख इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच शासन आदेश निघणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिली आहे.
मंत्रालयात याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर फुके यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत राज्यभरात शासनाच्या दीड लाख इमारती आहेत. या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास हजारो दशलक्ष लिटर पाण्याचा वापर तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी मदत होणार आहे. त्याउद्देशाने हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फुके यांनी स्पष्ट केले.
रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात जो विभाग कार्यवाही करणार नाही त्यांना यापुढे इमारत दुरुस्ती निधी दिला जाणार नाही. तसेच यासंदर्भातील शासन आदेश दोन दिवसात काढण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिली.