मुंबई- येथील शनिवारपासून पडत असलेला संततधार पाऊस आजही सकाळी जोरात सुरू आहे. या जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. कुर्ला ते सायन स्थानकांच्या दरम्यान रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झालेली आहे.
शहरातील सखल भागात पाणी भरल्याने लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे. कुर्ला ते सायन स्थानकांच्या दरम्यान, रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे व पुढे कल्याण दिशेला जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या आणि लोकल कुर्ला रेल्वे स्थानकावर थांबून ठेवण्यात आलेल्या आहेत. वडगाव वरून मुंबईला येणारी मेल एक्सप्रेस गाडी कुर्लाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर थांबवून ठेवण्यात आलेली आहे. सकाळी 5.30 वाजता ही गाडी आली होती. तर दोन्ही बाजूला जाणाऱ्या लोकल सुद्धा या ठिकाणी थांबलेल्या आहेत. कायम प्रवाशांची गर्दी असणाऱ्या कुर्ला स्थानकावर आज मात्र, अतिशय नगण्य प्रवासी दिसत आहेत.