मुंबई - राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई दरम्यान रेल्वे आणि विमान वाहतूक रोखल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येईल, याबाबत राज्यात उच्चस्तरीय विचार विनिमय सुरू आहे. मात्र, या दोन्ही शहरांदरम्यान रेल्वे सेवा बंद करण्याचा सध्यातरी कोणताही विचार नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वे मंत्रालयानेही ट्विट करून असा कोणताही विचार नसल्याचे सांगितले आहे.
वाहतूक बंद करण्याचा गांभीर्याने विचार -
एकीकडे राजधानी नवी दिल्लीत कोरोनाने डोके वर काढले असून तिथे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. तर, मुंबई आणि दिल्ली या महानगरांमध्ये वाहतूक वाढून रुग्ण संख्या वाढू नये यासंदर्भात रेल्वे आणि विमानसेवा बंद ठेवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबाबत आपले मत व्यक्त करताना, दिवाळी तसेच धार्मिक स्थळ उघडल्यानंतर मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, पुढील पंधरा दिवस शहरात येणाऱ्या मेल गाड्या बंद करणे आवश्यक झाले आहे असे म्हटले आहे.
तर, पालकमंत्री अस्लम शेख यांनी, कोरोनाचे रुग्ण वाढले तरी शहरात याबाबतची तयारी प्रशासनाने केली आहे. तसेच, रेल्वे आणि विमानसेवा याबाबत नियमावली करणे आवश्यक आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. पण, हे शक्य होत नसल्यास वाहतूक बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन मुंबई-दिल्ली या शहरांदरम्यान वाहतूक बंद करण्याचा गांभीर्याने विचार करत असताना रेल्वे प्रशासनाने कोणत्याही आस्थापनांशी चर्चा न करता रेल्वेची विशेष वाहतूक सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठोस निर्णय नाही -
दरम्यान राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी कालपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. याबाबत अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास वाहतूक बंद करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला जाऊ शकतो, असे गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - मेळघाटातील घुंगरू बाजार : याव्षीही परंपरा जोपासताहेत आदिवासी बांधव