मुंबई : शहर हे जागतिक दर्जाचे शहर आहे. शहरात रेल्वे विना प्रवास सामान्यांसाठी अशक्य मानला जातो. पण आता रेल्वेतून प्रवास करणारे आता कायदा मोडून रेल्वेचा प्रवास करत असल्याचे समोर आले. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेने माहिती दिली आहे की, आतापर्यंत तब्बल 16 हजार 800 प्रवाशांनी कायद्याचे उल्लंघन करत रेल्वेतून प्रवास केला आहे. यामध्ये महिला किंवा विकलांग डब्यातून प्रवास करणारे तसेच चेन पुलिंग करणाऱ्या प्रवाशांचा देखील समावेश आहे. दरम्यान कायद्याचे उलंघन केल्यामुळे तृतीयपंथ्यांवर देखील कारवाई करण्यात आली असल्याचे, रेल्वे प्रशासनाने सांगितले.
प्रवाशांवर कारवाई का ? : मुंबईमधील ७५ लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. गर्दीमध्ये प्रवास करावा लागू नये म्हणून प्रवासी बहुतेक वेळा विकलांग आणि महिलांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अशा प्रकारे कायदा मोडून प्रवास करतात याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारी संदर्भात कार्यवाही म्हणून रेल्वे सुरक्षा बलाकडून एक महिन्याचे अभियान सुरू केले आहे. महिला आणि दिव्यांग यांच्यासाठी राखीव डब्यातून प्रवास करणारे पुरुष आणि इतर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रेल्वेमध्ये जबरदस्ती पैसे गोळा करणारे तृतीयपंथी यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. हे अभियान महिनाभर चालणार आहे.
रेल्वे प्रशासनाची लाखोंची दंडवसूली : महिला आरक्षित डब्यात प्रवास करणारे, अनारक्षित डब्यात प्रवेश करणाऱ्या ५१०० पुरुष प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामधून ६ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अपंगासाठी राखीव डब्ब्यात प्रवास करणाऱ्या ६३०० हून अधिक प्रवाशांवर करवाई करून ८ लाख ६८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेमध्ये गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा तृतीयपंथीयांचा उपद्रव सुरू झाला आहे. तृतीयपंथीयांवर कारवाई करून १ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सीट अडवून बसलेल्या ३६ जणांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
चेन खेचणाऱ्या प्रवाशांवर करावी : त्याचप्रमाणे रेल्वेच्या मुंबई विभागात ट्रेन एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवास करताना उशीर झाल्यास किंवा इतर काही अडचण आल्यास प्रवासी चेन खेचून गाडी थांबवतात. विनाकारण चेन खेचून गाडी थांबवणाऱ्या ३३०२ प्रवाशांवर कारवाई करून २३ लाख ७९ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.