मुंबई Rahul Narwekar : राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. 10 जानेवारीला अपात्रतेच्या याचिकांसंबधी निकाल जाहीर केला. आज 16 जानेवारीला अनेक माध्यमातून विशेषत: काही पक्षाचे पदाधिकारी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आणि सत्य परिस्थिती मांडण्यासाठी आलो असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले. निकाल दिल्यानंतर हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
पत्रकार परिषद की दसरा मेळाव्याचं भाषण : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली की दसरा मेळाव्याचं भाषण हे समजत नाही. मला वाटलं की, माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्यावर बोललं जाईल. मात्र त्यांनी राज्यपालांना शिव्या देणं, फालतू म्हणणं, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं सुरू केलं. ज्यांचा संविधानिक संस्थांवर विश्वास नसेल तर त्यांचा संविधानावर विश्वास कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मला दोन्ही बाजूंकडून दावे आले : राहुल नार्वेकर म्हणाले, "सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचा व्हीप म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती चुकीची असल्याचं कधीही म्हटलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, सभापतींनी खरी शिवसेना ओळखली पाहिजे. कारण मला दोन्ही बाजूंकडून दावे आले होते. त्यानुसार मी माझा निकाल दिला".
कशाच्या आधारे निर्णय घेतला : "सर्वोच्च न्यायालयानं जे आपल्या निकालात म्हटलं आहे तेच मी म्हटलं. 21 जून 2022 ला उपाध्यक्षांनी अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांना मान्यता दिली तेव्हा उपाध्यक्षांकडे एकच पत्र होतं. ती भूमिका राजकीय पक्षाची आहे हे गृहीत धरून निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचा दावा माझ्यासमोर होता. यात राजकीय पक्ष नेमका कोणता आहे हे ठरवल्या शिवाय मी निर्णय दिला, म्हणून तो अयोग्य आहे. सर्वोच्च न्यायालयानं असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावले यांची नियुक्ती चुकीची आहे. मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे निर्णय दिला", असं राहुल नार्वेकर म्हणाले.
10 तारखेला सविस्तर निर्णय दिला : "मी 10 तारखेला सविस्तर निर्णय दिला. ते म्हणतात की 1999 ची घटना योग्य आणि 2000 ची घटना अयोग्य ठरवली. निवडणूक आयोगाकडे जे अधिकृतपणे दाखल झालं त्या पद्धतीनं निर्णय घेतला गेला. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं होतं, मी 7 जून 2023 ला निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आणि अधिकृत पक्ष कोणता याबाबत विचारणा केली. याबाबत सविस्तर अधिकृत माहिती मागितली. त्यावर 22 जून 2023 ला निवडणूक आयोगाकडून माहिती प्राप्त झाली. त्यात 1999 ची प्रत मला देण्यात आली. मी त्यांना शिवसेनेची घटना सुधारित आहे का याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 2018 ची अपडेट केलेली घटना रेकॉर्डवर नाही. त्यांनी म्हटलं की आम्ही इलेक्शन कमीशनकडे सुधारित प्रत दिली, जे की पूर्णपणे खोटं आहे", असं राहुल नार्वेकरांनी सांगितलं.
"वारंवार जे सांगितलं जातं की घटनेत झालेल्या बदलांबाबत मला माहिती देण्यात आली हे पूर्णतः चुकीचं आहे. जे पत्र शिवसेनेनं निवडणूक आयोगाला दिलं होतं, 2013 मध्ये त्यात कुठेही घटनेत काही दुरुस्ती झाली आहे याचा उल्लेख नाही. जी संघटनात्मक निवडणूक झाली त्याच्या निकालाची प्रत त्यांनी निवडणूक आयोगाला दिली होती", असं राहुल नार्वेकर म्हणाले.
हे वाचलंत का :