मुंबई - विरोधकांकडून कितीही आरोप होत असले तरी, महाविकास आघाडीत कुठलाही बेबनाव नाही. शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचा हाच दावा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळते आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आहे, या राहुल गांधी यांच्या विधानावरून मोठा गदारोळ माजला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. अखेर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. त्यामुळे सरकारमध्ये मतभेद असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यांच्याशीही मुंबईतील कोरोना संसर्ग परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार करण्यात येत असलेल्या विशेष उपाययोजनांवर देखील चर्चा झाल्याची माहीती मिळते आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्ता सहभागाबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर महाविकास आघाडीतील एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.