मुंबई - विविध गॅस कंपन्यांच्या घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस दुसऱ्या गॅस सिलींडरमध्ये भरून ग्राहकांची लूट करणाऱया टोळीचा छडा मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गॅस डीलीव्हरी बॉयचे काम करणाऱ्या ८ जणांना अटक केली आहे.
मुंबईतील वाळकेश्वर परिसरात गॅस सिलिंडर डिलीव्हरी करणारे काही जण घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो रिकामा असलेल्या सिलिंडरमध्ये भरून गरजू लोकांना दामदुप्पट भावाने विकत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ८ जणांना अटक केली आहे.
अटकेतील आरोपींकडून गॅस चोरी करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही टोळी १ रिकामा गॅस सिलिंडर भरण्यासाठी १० ते १२ गॅस सिलिंडरमधून प्रत्येकी १ ते २ किलो गॅस चोरी करत होते. चोरलेला गॅस ही टोळी १००० रुपयांना काळ्या बाजारात विकत होते. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ७७ गॅस सिलींडर हस्तगत केले आहेत. या प्रकरणी नामांकित गॅस कंपनी एजन्सीची चौकशी पोलीस करीत आहेत.
स्वयंपाक करण्यासाठी घरात वापरण्यात येणारा गॅस सिलिंडर लवकर संपल्यावर बऱ्याच गृहिणींची तक्रार असते की गॅस सिलिंडर हा अर्धाच भरलेला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे गॅस काढून त्याची विक्री होत असलयाचे आता उघड झाले आहे. त्यामुळे तुमच्या घरात येणारा गॅस हा पूर्णपणे भरलेल्या अवस्थेत येतो का हे पाहण महत्वाचे आहे.