मुंबई - मुंबईत मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सीचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. यामुळे मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रिक्षा टॅक्सीवर लाखो लोकांचे कुटुंब अवलंबून असते. गॅसची दरवाढ आणि महागाई यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीला १ ऑक्टोबरला सरकारने मंजुरी दिली आहे. दरवाढ लागू झाल्याने त्याप्रमाणे मीटरमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. अद्यापही रिक्षा आणि टॅक्सी मिळून अद्याप ५० टक्के वाहन विना रिकॅलिब्रेशन रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करत आहे. यामुळे आता मीटर रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाणार आहे.
६८.२९ टक्के टॅक्सी मीटरचे रिकॅलिब्रेशन - परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य मुंबईत २६ हजार ७३८ एकूण काळी पिवळी टॅक्सी आहेत. त्यापैकी ६८.२९ टक्के टॅक्सीच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन झाले आहे. पच्छिम मुंबईत ६४१८ एकूण काळी पिवळी टॅक्सीची संख्या असून, ५२.९८ टक्के रिकॅलिब्रेशन झाले आहे. तर मुंबई पूर्व आरटीओ अंतर्गत ८२६४ टॅक्सी असून त्यापैकी ५०.४१ टक्के रिकॅलिब्रेशन झाले आहे. मुंबई पूर्व विभागात ८२३६८ रिक्षा असून ५६.६८ टक्के मीटरचे रिकॅलिब्रेशन झाले आहे. पच्छिम मुंबई विभागात ५६ हजार ००८ रिक्षा असून ७३.३६ टक्के मीटरचे रिकॅलिब्रेशन झाले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
अशी झाली दरवाढ - १ ऑक्टोबरला ऑटो रिक्षा व टॅक्सीच्या दरवाढीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी पहिल्या १.५ किलोमीटरसाठी पूर्वीचा दर २१ रुपये होता. त्यात वाढ करून २३ रुपये, असा दर ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी १४.२० पैसे असा दर होता, तो आता १५.३३ पैसे असा करण्यात आला आहे. टॅक्सीसाठी प्रथम १.५ किमीसाठी पूर्वी २५ रुपये होते. ते २८ रुपये असे करण्यात आले आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी १६.९३ पैसे दर होता, तो आता १८.६६ पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम १.५ किमीसाठी पूर्वीचा दर ३३ रुपये भाडेदर होता, तो आता ४० रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर २२..२६ पैसे होता, तो सुधारित २६.७१ पैसे असा ठरविण्यात आला आहे.