मुंबई - कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता येथील गणेशोत्सव रद्द करण्यात आले आहेत. यामुळे गणेशोत्सवादरम्यान होणारी तब्बल 80 कोटींची उलाढाल यावेळी होणार नसल्याची माहिती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकडून देण्यात आली आहे. यावर्षी गणेशोत्सवादरम्यान होणारी उलाढाल ठप्प झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या लोकांवरही त्याचा परिणाम होणार आहे.
जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत 11 दिवस मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव 11 दिवस असला तरी त्याची तयारी दोन महिन्याआधी सुरु केली जाते. श्रीगणेशाची मूर्ती, सजावट, दागिने, वस्त्र, लायटिंग, फुले फुलांचे हार याची खरेदीही या दरम्यान मोठ्या प्रमाणात केली जाते. मुंबईत सार्वजनिक 13 हजार 347 तर 2 लाख 22 हजार 26 घरघुती असे एकूण 2 लाख 35 हजार 373 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी तब्बल 80 कोटी रुपयांची उलाढाल या दोन महिन्यांच्या कालावधीत होते. यावर्षी मात्र, मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्ली, तेजुकाय मेंशन, गिरगावचा राजा, चेंबूरचा राजा आदी ठिकाणी उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. याठिकाणी केली जाणारी सजावट यामुळे लाखो भाविक भेट देतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमुळे सार्वजनिक मंडळेही चार फुटाची गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. भाविकांनीही घरात राहून गणेशाचे दर्शन घ्यावे, यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या खरेदी विक्रीच्या 80 कोटींच्या उलाढालीवर त्याचा परिणाम होणार आहे.
हेही वाचा - शेतकरी असल्याचा अभिमान... नवविवाहित दाम्पत्याची वरात बैलगाडीतून नवरदेवाच्या दारात
लालबागचा राजा गणेशोत्सव हा मुंबईत प्रसिद्ध आहे. आमच्या मंडळाची दरवर्षी 10 ते 12 कोटींची उलाढाल होते. यावर्षी कोरोनामुळे मुख्यमंत्र्यानी केलेल्या आवाहनानुसार आम्ही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहोत. यावर्षी सर्वच गणेशोत्सव साधेपणाने साजरे करणार असल्याने उलढालीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी या कामातील लोकांना आमच्या मंडळाकडून मदत दिली जाईल. इतर मंडळांनीही त्यांना मदत करावी. आमच्या मंडळाकडून मुख्यमंत्री निधीला 25 लाखांची मदत दिली जाणार आहे. तसेच रुग्णांना दिली जाणारी मदत, डायलेसीस, शिष्यवृत्ती आदी योजनांसाठी आम्ही नियोजन केले आहे, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांनी दिली.