मुंबई: मुंबईसह राज्यातील पोलीस दलावर प्रचंड तणाव असल्याचे चित्र पोलीस दलात होणाऱ्या आत्महत्यांवरून दिसत आहे. मुंबई पोलीस दलातील भायखळा महिला कारागृहात तैनात असलेल्या श्याम वारघडे या पोलिसाने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केली. ही घटना कालचीच असून गेल्या महिन्यातच येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले फौजदार शेषराव राठोड यांनी 5 जानेवारीला दुपारी एकच्या सुमारास गोदावरी नदीवर असलेल्या गोवर्धन घाट पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने एका माजी सैनिकाच्या तत्परतेमुळे ते बचावले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांना जीवनाची किंमत कळू द्या: प्रसिद्ध मानसोपचार डॉ. राजेंद्र बर्वे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी ते सर्वसामान्य पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत सर्वच प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. समाजाची अपेक्षा आणि समाजात असलेली त्यांची प्रतिमा आणि प्रत्यक्ष काम त्यातच कुटुंबापासून वेगळे राहणे, कुटुंबातील कलह अशा अनेक गोष्टींनी त्यांच्या मनावर ताण पडतो. आपला समाज आणि पोलीस दल पुरेसे सेन्सिटिव्ह नाही. पुरेशी संवेदनशीलता त्यांच्यात नाही आहे की, अशा व्यक्तीला समजून घेतले पाहिजे. त्यांना समजून सांगून त्यांना जीवनाची किंमत कळू दिली पाहिजे. अशी व्यवस्था असायला हवी. अशा प्रकारचा समाज आणि सिस्टीम निर्माण होणे खूप गरजेचे आहे आणि हेच या आत्महत्येतून प्रतीत होत आहे, अशी माहिती प्रसिद्ध मानसोपचार डॉ. राजेंद्र बर्वे यांनी दिली आहे.
पोलिसांच्या आत्महत्या: पोलीस दलातील आत्महत्या या बऱ्याचदा मानसिक आणि कामाच्या तणावातून झाल्याच्या निदर्शनास आले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या आणि मंत्रालयाच्या सुरक्षा विभागात कार्यरत काळुराम चैत्राम अहिरे (वय ५७) या पोलिसाने त्याच्या मूळ गावी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली. पहुबारे (ता.साक्री) या मूळगाव काळुराम चैत्राम अहिरे यांनी आत्महत्या केली. नोव्हेंबर २०२२ मध्ये धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. प्रविण कदम असे या पोलीस निरीक्षकाचे नाव होते. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण कदम यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात घडली होती.
पोलिसाची राहत्या घरी आत्महत्या: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शिवाजीनगर सुनील नारायण शिंदे (वय ५०) यांनी २७ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या आत्महत्येप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली. घरातील इतर सदस्य शिंदे यांच्या खोलीत गेले तेव्हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पंख्याला खिडकीच्या पडद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते.
हेही वाचा: Cock reached police station: 'लेग पीस' तोडला.. मालकिणीसह कोंबड्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव.. गुन्हा दाखल