मुंबई - कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपला जीव धोक्यात घालून गरजू लोकांना मदत पोहोचवण्याचे काम करत आहे. या काळात त्यांना काही झाले तर त्यांचा कुटुंबाचे काय होणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे अशा स्वयंसेवकांना गट विमाअंतर्गत संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अॅड. रितेश करकेरा यांनी केली आहे.
केंद्र सरकारने आणखी 2 आठवडयांसाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा तिसरा लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपणार आहे. आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. यामुळे या दिवसांत गरजूपर्यंत मदत करण्यासाठी स्वयंसेवकांना काम करावे लागणार आहे. मात्र, या मदत करणाऱ्या सेवकांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
कोरोना संकटात अनेक डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांची सेवा करताना कोरोनाची लागण झाली होती. सरकारने त्यांच्यासाठी विमा कवच उपलब्ध केले आहे. मात्र, अनेक सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक या काळात काम करत आहेत. त्यांना कोणते संरक्षण कवच नाही आहे. काही दिवसांपूर्वी एका पालिका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. जर योग्य ट्रेनींग देऊन पालिका अधिकाऱ्यांचा मृत्यू होत असेल, तर या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक धोका आहे. यामुळे या संकट काळात काम करणाऱ्या सरकारी आणि सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच पालिका आणि पोलीस प्रशासनाने असा स्वयंसेवकांना काम करण्यासाठी पासेस दिले आहेत. यामुळे अशा लोकांचे वर्गीकरण करणे ही सोपे असल्याचे करकेरा म्हणाले.