मुंबई - घाटकोपरच्या भटवाडीतील महाकाली माता मंदिराजवळील एका चाळीतील 30 वर्षे जुने असलेले शौचालय पालिकेने नोटीस न देता 3 दिवसांपूर्वी पाडून टाकले. यामुळे आज गुरुवारी विभागातील राहिवाशांनी पालिका एन विभागावर टमरेल हातात घेऊन आंदोलन केले.
भटवाडी विभागातील रहिवाशांनी संतप्त होत 3 दिवसांपूर्वी शौचालय पाडकाम काही वेळ रोखून धरले होते. यावेळी पोलीस आणि राहिवाशांत काहीवेळ बाचाबाचीही झाली. यानंतर काही रहिवाशांनी घाटकोपर एन विभाग पालिका उपआयुक्त रणजित ढाकणे यांना घेराव घातला होता. यावेळी पालिका उपाआयुक्त यांनी चर्चा करण्यासाठी वेळ देत आज कार्यालयात बोलावले होते.
विकासकाने शौचालय तोडून जवळील एका इमारतीत पर्यायी व्यवस्था केली आहे. पण ती अपुरी पडत आहे. विभागात 2000 च्या वर रहिवाशी आहेत. आम्ही खासगी इमारतीत शौचालयासाठी का जायचे हक्काचे शौचालय तोडून इतरांकडे पालिका का बोट दाखवत आहे,असे आंदोलक महिलांचे म्हणने आहे.
आज संतप्त राहिवाशांनी पालिका उपआयुक्त रणजित ढाकणे यांची भेट घेतली. आंदोलक राहिवाशांना ते शौचालय तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोटीस पालिकेने बजावली नव्हती. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे, असे आश्वासन पालिकेतर्फे देण्यात आले.