मुंबई - मुंबईत मुसळधार पावसामुळे भिंत कोसळण्याची घटना ताजी असताना पवईत डोंगराळ भागातील वर्दळीच्या रस्त्यावरील संरक्षण भिंत आज कोसळली. दरम्यान, भिंतीचा मलबा ३० फूट खाली पडून वाहनांचे नुकसान झाले आहे.
पवईतील डोंगराळ भागावरील गौतम नगर, इंदिरा नगर, गरीब नगर, रमाबाई नगरात दाट लोकवस्ती आहे. हा सर्व झोपडपट्टीचा भाग आहे. याठिकाणी असणाऱ्या एकमेव रस्त्यावर संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गरीब नगर येथील लिओ चर्च समोरील संरक्षण भिंत आज ३० फूट खाली कोसळली. त्यामुळे सनसीटी कॉम्पलेक्स येथील सुरू असलेल्या खोद कामासाठी उभ्या असलेल्या जेसीबीसहीत अन्य वाहनांचे नुकसान झाले आहे.
डोंगराळ भागातील संरक्षण भिंतीचा प्रश्न ऐरणीवरच -
पवईतील डोंगराळ भागातील वस्तीची संरक्षक भिंत आणि दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असताना या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. २०-२५ वर्ष जुनी असणाऱ्या संरक्षक भिंतीची डागडुजी करत नवीन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून पवईतील युथ पॉवर संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, महानगरपालिका आणि म्हाडा यांनी हात झटकत असल्याचे युथ पॉवरचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. त्यामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागला असून पवई येथील या परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. यातील गांभीर्य लक्षात घेऊन पवईतील सामाजिक संस्था युथ पॉवर संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र, पालिकेने 'आमच्या अख्यत्यारित्या संरक्षक भिंत उभारण्याचे काम येत नाही', असे पत्रच युथ पॉवर संघटनेला पाठवले होते. त्यामुळे या जीवघेण्या संरक्षक भिंतीचा प्रश्न कोण मार्गी लावणार? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे महानगरपालिका आणि म्हाडा प्रशासन विरोधात रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.