मुंबई : दिवसेंदिवस वेश्याव्यवसाय रॅकेटचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिसांनी अशा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकत असतो. मागील महिन्यात दिंडोशी पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेट चालवून ग्राहकांना मॉडेल पुरवल्याच्या आरोपाखाली महिला कास्टिंग डायरेक्टरला अटक केली होती. छापे टाकून रंगेहाथ पकडण्यात आले होते. अशीच एक घटना वांद्रे परिसरातून समोर आली आहे. नुकतेच स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केल्याची घटना घडली आहे. याच गुन्ह्यांत एका पुरुष दलालाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड संविधानसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या महिलेला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
थाई ड्रिम स्पामध्ये छापा : वांद्रे येथील वॉटर फिल्टर रोड, अरास इमारतीमध्ये थाई ड्रिम नावाचे एक स्पा सेंटर आहे. या स्पामध्ये देश-विदेशातील तरुणींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात आहे. काहींना ग्राहकांसोबत पाठविले जात असल्यााची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने तिथे शहानिशा केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच शुक्रवारी या पथकाने थाई ड्रिम स्पामध्ये छापा टाकला होता.
स्पाच्या नावाने वेश्याव्यवसाय : या कारवाईत पोलिसांनी स्पाच्या महिला मॅनेजरला अटक केली. यावेळी तिथे थायलंड, मिझोरोम, दार्जिलिंग आणि नागालँडच्या पाच तरुणी सापडल्या. या पाचही तरुणींची सुटका केल्यानंतर त्यांची मेडीकल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. त्यांच्या चौकशीत तिथे स्पाच्या नावाने वेश्याव्यवसाय चालत असल्याचे उघडकीस आले. ही महिला एका पुरुष दलालाच्या मदतीने तिथे वेश्याव्यवसाय रॅकेट चालवित होती. या कबुलीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय दंड संविधानसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या सर्वांना नंतर खार पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते.