मुंबई : एक, दोन तीन चार...गोविंदाचा उत्साह वाढणाऱ्या या घोषणा आता सर्वत्र घुमणार आहेत. कारण यंदापासून प्रो गोविंदा स्पर्धा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार जन्माष्टमीनिमित्त, दही हंडीला 'प्रो गोविंदा' स्पर्धा आयोजित करणार आहे. याबाबतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिलीय.
दही हंडीचा खेळ : संपूर्ण महाराष्ट्रात जन्माष्टमीचा सण अनेक ठिकाणी दही हंडी करत साजरा केला जातो. श्री कृष्णाच्या जन्माचा आनंद म्हणून दरवर्षी जन्माष्टमीचा साजरी केली जाते. हा सण 'गोपालकाला', 'दही-हंडी' या नावानेही ओळखला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णांनी त्यांच्या बालपणी 'माखन चोरी' केली होती. त्याचाच एक भाग म्हणून दही हंडी केली जाते. या दिवशी 'गोविंदा' पथक एकावर एक मानवी थर रचत उंच बांधलेली दही हंडी फोडतात. दरवर्षी उत्साहाने केली जाणारी दही हंडी यंदा अजून मोठ्या उत्साहात साजरा केली जाणार आहे. गेल्या वर्षी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दही हंडीला महाराष्ट्रात खेळ म्हणून मान्यता दिल्यानंतर यावेळी प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पेन आणि चीनसारख्या देशांमध्ये ज्याप्रमाणे व्यावसायिक पद्धतीने स्पर्धा केली जाते. त्याचप्रमाणे यंदा प्रो-गोविंदा स्पर्धा होणार आहे.
कुठे होणार स्पर्धा : प्रो गोविंद स्पर्धा खेळवली जावी,अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखाली सरकारने या स्पर्धा आयोजित करणार आहे. प्रो गोविंदा स्पर्धा मुंबईतील वरळी येथील एनएससीआय येथे होणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी गोविंदा पथकाला 40 फूट उंच असलेल्या मटक्याला फोडावे लागेल. यासाठी प्रथम पारितोषिक 11 लाख रुपयांचे असेल, त्यानंतर अनुक्रमे 7 लाख , 5 लाख आणि 3 लाख रुपयांचे दुसरे, तिसरे आणि चौथे बक्षीस असेल, असं सामंत म्हणाले.
खेळात जखमी झालेल्या गोविंदांसाठी आम्ही 50 हजार गोविंदांसाठी 37 लाख रुपयांचा प्रीमियम भरलाय.सुमारे 3 हजार 500 गोविंदांची नोंदणी आधीच झालीय.ही स्पर्धेदरम्यान उपाय योजना आणि सुविधांची सोय केली जाईल. कोणतीही स्पर्धेदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली तर 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. - उदय सामंत,उद्योगमंत्री
विमा मिळणार : दरम्यान हा खेळ खेळत असताना, अनेक गोविंदांना दुखापत होत असते. यासाठी सरकारने गोविंदांसाठी विमा काढलाय. तसेच काही अनुचित प्रकार घडला तर नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी लागणारा निधी देण्याचे आश्वसन अजित पवारांनी दिल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेदरम्यान एखादी दुर्घटना झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पालिका, खासगी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 27 ऑगस्ट रोजी वरळी येथील डोम येथे या स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत चालणार आहे.
हेही वाचा-