मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रेन क्रमांक 82901/82902 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 7 ऑगस्ट 2021 पासून पुन्हा तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र प्रवासी कमी असल्याने शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस तेजस एक्स्प्रेस धावू लागली होती. 22 डिसेंबर 2021 पासून बुधवार जोडून आठवड्यातील 5 दिवस तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र आता गुजरात आणि महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्याने आयआरसीटीने मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस चालण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी घेतला निर्णय- आयआरसीटीसी जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी सांगितले की, उन्हाळाचा सुट्या लक्ष्य घेता, प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे 12 एप्रिल 2022 पासूनट्रेन क्रमांक 82901/82902 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. फक्त गुरुवारी तेजस एक्स्प्रेस बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे 750 कोटी रुपयांचा तोटा- मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसला सुरुवातीला प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत होता. मात्र कोरोनामुळे या खासगी तेजस एक्सप्रेसचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. कोरोना काळात प्रवासी मिळत नसल्याने अनेकदा एक्स्प्रेस बंद करण्याची नामुष्की आयआरसीटीसीवर आली होती. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आतापर्यंत या गाडीला 750 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आयआरसीटीच्या सूत्रांनी दिली आहे.