मुंबई : महाराष्ट्रातील तुरुंगामध्ये असलेले कैदी दर महिन्यातून वकिलांशी दोन वेळा फोनवर बोलू शकतात. तसेच कुटुंबातील सदस्यांशी देखील दहा मिनिटे बोलू शकतात. त्याचे कारण त्यांनी जर वकील किंवा आपले नातेवाईक यांच्याशी संवाद साधला, तर एकूणच त्यांच्या व्यवहारांमध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये काही बदल झाल्याचे महाराष्ट्र कारागृह विभागाला अभ्यासांती आढळलेले आहे. त्यामुळे राज्यांमधील 36 तुरुंग आणि त्यामधील असलेले 76 कॉइन बॉक्स तेथे नियमानुसार आता तुरुंगातील कायद्यांना महिन्यातून दोन वेळेला दहा मिनिटे एवढ्या काळासाठी फोन करण्याची परवानगी दिली गेली आहे.
तुरुंगात कॉइन बॉक्स : राज्यातील कारागृहांमध्ये ठराविक पद्धतीचे कॉइन बॉक्स बसवलेले आहे. त्यामध्ये १ रुपयाचे नाणे टाकले असता, त्या कैद्यांना तितके बोलता येणार आहे. त्या कैद्यांना दहा मिनिटे बोलण्याची परवानगी आता दिली जाईल. ज्यामुळे ते आपले वकील किंवा आपले नातेवाईक यांच्याशी खटल्याच्या अनुषंगाने आणि आपल्या भावभावना कुटुंबासोबत व्यक्त करू शकतील; अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे.
यामुळे कारागृह विभागाने घेतला निर्णय : हा निर्णय घेण्याची पाळी का आली यासंदर्भात कारागृह विभागाचे म्हणणे असे की, आमच्या अभ्यासात आणि अध्ययनात ही बाब दिसून आलेली आहे. जे कैदी तुरुंगामध्ये खितपत पडलेले असतात. त्यातील अनेकांना त्यांचे कुटुंबातील सदस्य भेटत नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खालावते. काही वेडसर झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यांची वागणूक व्यवस्थित राहत नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये कैद्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. त्यांच्या वकिलांकडून सुद्धा त्यांना नियमित भेट मिळत नाही. त्यामुळे कोणाकडूनही त्यांचा संवाद होत नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळते. याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि एकूण कारागृहातील वातावरणावर होऊ शकतो.
राज्याचे कारागृह अतिरिक्त महासंचालकांचा निर्णय : महाराष्ट्र कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या कार्यालयाने तुरुंगातील जे कैदी आहे, त्यांच्या मनावरील तणाव कमी करण्यासाठी त्यांच्यात सुधार करण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि संबंधित वकील यांच्यासोबत आता या कायद्यांना महिन्यातून दहा मिनिटे दोन वेळा फोनवर बोलता येणार आहे. त्याची परवानगी दिली जाईल. फोन क्रमांक सत्यापित व पडताळणी केल्यावर फोनवर बोलण्यास परवानगी दिली जाईल. ज्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करायचा असेल तो खरा आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्या क्रमांकावर त्याबाबत त्या कैद्याला आपल्या कुटुंबाशी आणि वकिलांसोबत महिन्यातून दोन वेळा टेलिफोनद्वारे बोलता येऊ शकेल, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर उच्च अधिकाऱ्याने सांगितली.