मुंबई - मुंबईमधील मध्ये रेल्वेचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला हेरिटेजचा दर्जा आहे. हेरिटेज असलेल्या या स्थानकाला कोणताही हात न लावता या स्थानकाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर स्थानकात सर्व सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १९ जानेवारीला मुंबईत येत आहेत. यावेळी ते मेट्रोच्या उद्घाटनासह अनेक कामांचे भूमिपूजन करणार आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
असे होणार सुशोभीकरण - आशिया खंडात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. मुंबईत बोरीबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचे मुख्यालय बांधण्यात आले आहे. इंग्रजांच्या काळात हे मुख्यालय बांधण्यात आल्याने या इमारतीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. येथील मध्य, हार्बर मार्गावरील सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. अशा या स्थानकाचे विमानतळाच्या धर्तीवर सुशोभीकरण केले जाणार आहे.
रेल मॉल उभारण्यात येणार - सीएसएमटी परिसरात ‘रेल मॉल’ उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाच्या सुविधा असतील. सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफेटेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. सुविधांकरीता आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. यामध्ये रेल्वे ४० टक्के, खासगीची ६० टक्के गुंतवणूक असेल.
१ हजार ३५० कोटी खर्च अपेक्षित - सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पासाठी जवळपास १ हजार ३५० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. सीएसएमटी इमारतीचा जीर्णोद्धार, विकासाचे काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र हेरिटेज कन्झरव्हेटिव्ह समितीची मंजुरी मिळाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेरिटेज गॅलरी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील २ लाख ५४ हजार चौरस मीटर इतकी जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. त्यात प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळासाठी जागा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार आहे. त्याऐवजी समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हेरिटेज गॅलरी उभारली जाणार आहे.
सर्वोत्कृष्ट सेल्फी पॉईन्ट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची मुख्य इमारत १८७८ मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरीक विल्यम स्टीव्हन यांनी बांधण्यास सुरुवात केली होती. २० मे १८८८ मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली. त्याकाळी ही इमारत बांधण्यासाठी १६.१४ लाख रुपये खर्च आला होता. १८८७ मध्ये लंडनची राणी व्हिक्टोरिया हिच्या नावाने व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव ठेवण्यात आले. १९९६ मध्ये राज्य विधिमंडळात या इमारतीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात यावे, असा ठराव करण्यात आला. संसदेने त्याला संमती दिली. मुंबईत येणार्या प्रत्येक पर्यटकाला ही इमारत आतून, बाहेरून पाहण्याचा मोह आवरत नाही. आकर्षक वास्तूकलेमुळे ही इमारत प्रवासी आणि पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन - मेट्रो २ आणि ७ च्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. यावेळी पालिकेच्या सुमारे १५ प्रकल्पांचे सुशोभीकरणाचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. याच कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले जाऊ शकते अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.