मुंबई Pressure On Thackeray group : देशात २०१४ पासून भाजपाचे सरकार आले आहे, तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा अधिकच सक्रिय झाल्या आहेत. (Income Tax Dept) ईडी, आयकर विभाग, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी आणि चौकशा वाढल्या आहेत. त्याचवेळी या यंत्रणांचा वापर सत्ताधारी भाजपा फक्त विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यात देखील (CBI) मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणाकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या पक्षातील नेत्यांची चौकशी होत आहे. त्यांच्यावर या यंत्रणेकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप होत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेते सूरज चव्हाण यांना ईडीने कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. यानंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना विशेषत: शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आज स्वतः राजन साळवी यांनीच याबाबतीत आरोप केला आहे.
ठाकरे गटावर दबाव वाढला - शिवसेनेतील फुटीनंतर आणि शिंदे गटाच्या बंडानंतर भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे सरकार उदयास आले. त्याआधी महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र जसे मविआचे सरकार गेले, तसे मविआ सरकारच्या काळातील विरोधकांचा भ्रष्टाचार आणि घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांकडून होत आहे. दुसरीकडे मविआ सरकारमध्ये शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्याचे आरोप होते. ते नेते सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांची चौकशी मात्र थांबली आहे. तर ठाकरे गटातील नेत्यांच्या संस्थावर छापेमारी करून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. यात कोकणातील आमदार राजन साळवी, आमदार रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई होत आहे. आता कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांना अटक केली आहे. त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून ठाकरे गटाचे खंदे समर्थक आणि नेत्यांवर एकाच वेळी तपास यंत्रणांच्या कारवाईचा फास आवळला जात असल्यानं ठाकरे गटावरील दबाव वाढल्याचं बोललं जात आहे.
राजकीय सूडानं कारवाई - ठाकरे गट : एकीकडे राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडत असताना, ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा वापर केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. आता सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर ठाकरे गटानं सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. "सूरज चव्हाण यांची राजकीय अटक आहे. फक्त सूड बुद्धीनं आमच्यावर कारवाई केली जात आहे. जे शिंदे गटात येत नाहीत. त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून कुरघोडीचं आणि सूडाचं राजकारण केलं जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. "भाजपा सत्तेचा गैरवापर करत असून, जे विरोधक त्यांच्या हाताला लागत नाहीत, त्यांना ईडीची भीती दाखवून त्रास दिला जातोय. मलासुद्धा शिंदे गटात येण्यासाठी विचारणा केली होती. पण मी येत नसल्यामुळं माझ्यावर सूडानं कारवाई केली जात आहे", असं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे.
कर नाही त्याला डर कसली - भाजपा : भाजपा सत्तेचा गैरवापर करत असून, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरलं जात आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे का? असा प्रश्न भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांना विचारला असता ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा ह्या स्वायत्त संस्था आहेत. जिथे गैरकारभार आहे तिथे त्यांच्याकडून चौकशी केली जाते. हे आमच्याकडून भाजपाकडूनच होत आहे किंवा आम्हीच करत आहोत असा याचा अर्थ काढणं चुकीचं आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. शेवटी कर नाही त्याला डर कसली? अशी प्रतिक्रिया गणेश हाके यांनी दिली आणि केंद्रीय तपास यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करताहेत. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असंसुद्धा हाके म्हणाले; मात्र मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं स्वाभाविकपणे ठाकरे गटावर देखील दबाव वाढत आहे, हे मात्र नाकारता येणार नाही.
हेही वाचा: