मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या संकल्पनेतून दादर येथील शिवाजी पार्क परिसरात विजेची रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच दीपोत्सव कार्यक्रमाचे ( MNS Deepotsav ) आयोजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आज मराठीतील नामवंत, दिग्गज कलाकारांनी हजेरी ( Presence of Marathi artists in MNS Deepotsav ) लावली.
कलाकारांची मांदियाळी - या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विनोदी अभिनेते अशोक सराफ त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, महेश कोठारे, विनय येडेकर, प्राजक्ता माळी, भरत दाभोळकर त्यांच्यासह अन्य कलाकारांनी हजेरी लावून उपस्थितांचा आनंद द्विगणित केला. यावेळी कलाकारांनी कळ दाबून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर नागरिकांनी एकच जल्लोष केला.
आज खरे दिवे लावले - यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर म्हणाले की, आजपर्यंत आम्ही चित्रपट क्षेत्रात अनेक दिवे लावले. परंतु आज खऱ्या अर्थाने दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावण्याची संधी या ठिकाणी मिळाली. आपला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सचिन पिळगावकर महेश कोठारे, अशोक सराफ या दिग्गज अभिनेत्यांनी मराठी रसिकांना गेली अनेक वर्ष भारून टाकले आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना आपल्या सोबत दिवाळी साजरी करताना पाहून जमलेल्या नागरिकांना मोठा आनंद झाल्याचे पाहायला मिळत होते.
यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्यासह अनेक मनसेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा दीपोत्सव तुळशी विवाह पर्यंत सुरू राहणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.