मुंबई - फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीचा काही भाग गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळला. यामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने योग्य भूमिका घेतली नाही. त्यामुळे दुर्दैवाने हे घडत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. दरेकर यांनी आज घटनास्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
पाऊस अचानक येत नाही, तो ठरलेला असतो. पण एक पावसाळा असा गेला नाही, की ज्या पावसाळ्यात इमारत कोसळत नाही किंवा कुणाचा मृत्यू झाला नाही. मनपा, म्हाडाने काळजी घेणे गरजेचे आहे. इमारतींबाबत जे निर्णय घ्यायला हवेत ते घेतले गेले नाही. त्यामुळेच हे घडले आहे. म्हाडा आणि महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असेल, तर सरकारने योग्य ती भूमिका घ्यायला हवी, असेही दरेकर म्हणाले. तसेच सरकारने इंटिग्रेटेड प्रोग्राम बनवावा. त्याद्वारे मुंबई उपनगरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा, असेही ते म्हणाले.
धोकादायक इमारतीमध्ये पुनर्वसनाची व्यवस्था करा. मुंबई मनपा, म्हाडा आणि सरकारने एका आठवड्यात हे जाहीर करावे. यासंदर्भात नियोजन व्हायला हवे. पण सरकारने ते केले नाही. त्यामुळेच हे घडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.